
जळगाव मिरर | २६ मार्च २०२६
भुसावळ तालुक्यातील चिंचोली गावाजवळ २४ मार्च रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुन्हे पानाचे (ता. भुसावळ) येथील श्रीकांत सुरेश पवार (वय २८) हे एका पाइप कंपनीत काम करत होते. ते २४ मार्च रोजी रात्री आपल्या मित्रासोबत दुचाकीने कंपनीत जात असताना चिंचोली गावाजवळ समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी श्रीकांत पवार यांना मृत घोषित केले. त्यांच्या मित्रासह दुसऱ्या दुचाकीचा चालक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रीकांत पवार यांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि एक वर्षाची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लहान मुलीच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




















