
जळगाव मिरर | २६ मार्च २०२६
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला असून, वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात आले आहेत. नागरिकांमधून या निर्णयाचे समाधान व्यक्त होत आहे.
चंदूआण्णा चौकात सातत्याने अपघात होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर निलेश बाविस्कर यांनी संबंधित समस्येचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत नगरसेविका सौ. जयश्री राहुल पाटील व राहुल सुरेश पाटील यांनी पुढाकार घेतला.
त्यांच्या प्रयत्नांतून चंदूआण्णा चौकासह पोलीस कॉलनी, पवार पार्क, गॅस गोडाऊन परिसर, गिरनाई कॉलनी, विठ्ठलवाडी तृप्ती कॉर्नर आदी ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. या उपाययोजनेमुळे वाहनांचा वेग नियंत्रणात राहून अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले आहेत. भविष्यातही अशा पद्धतीने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




















