
जळगाव मिरर | २८ मार्च २०२६
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर–मलकापूर महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. सुरतहून अमरावतीकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने २९ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी १२ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रात्री साधारण १:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक राजेंद्र विनायक सैंदाणे (वय ५६, रा. बोदर्डे, ता. पारोळा) हे आपला ट्रक (एमएच-१८ बीझेड-७०३९) घेऊन नरडाणा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे जात होते. मुक्ताईनगरजवळील एका पेट्रोल पंपासमोर त्यांनी ट्रक थांबवला होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या साई दर्शन ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने (एमपी-४४ झेडबी-०७७७) ट्रकला जोरदार धडक दिली.
या अपघातात बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसमधील प्रवाशांना जबर धक्का बसल्याने अनेक जण जखमी झाले. घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक व पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले.
या प्रकरणी ट्रकचालक सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून बसचालक अक्षय संतोष पाटील याच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात बसचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
जखमींमध्ये अक्षय संतोष पाटील (धुळे), योगेश पुंडलिक गरडे (दुधगाव), शेख इमरान शेख अशपाक (अकोला), परमेश्वर अंबादास बळकाट (नांदेड), दुर्गेश बापू पाचांदे (धुळे), शिवम विकास पुरी (आर्वी), गजानन त्र्यंबक कळसकर (खैरी दर्यापूर), माधुरी दिवाकर नंदगीरवाल (गडचिरोली), शिवा बंडू खराटे (यवतमाळ), संगीता गजानन कळसकर (सुरत), आशा मल्हारी भोंगळे (अकोला), तोताराम साबा परमारीक (राजस्थान) यांच्यासह इतर प्रवाशांचा समावेश आहे.
दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.





















