
जळगाव मिरर | २८ मार्च २०२६
जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच खोटे नगर परिसरात बंद घर फोडून चोरट्यांनी ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगर बसस्टॉपजवळील जय हिंद कॉलनी येथे राहणारे क्षितीज देविदास सुरडकर (वय ३०) हे खाजगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी घर बंद ठेवले असताना अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घराच्या दरवाज्याचा कडी-कोंडा तोडला आणि घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सुमारे २०० ग्रॅम वजनाची चांदीची प्लेट, वाटी, चमचा, ग्लास, इन्व्हर्टरची बॅटरी, एलसीडी टीव्ही, तसेच तीन पितळाचे पातेले आणि एक पितळी समई असा एकूण ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी २७ मार्च रोजी जळगाव तालुका पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पाटील करीत आहेत. दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच बंद घरांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





















