
जळगाव मिरर | २९ मार्च २०२६
जामनेर तालुक्यातील नेरी दिगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून मका कापणीसाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांपैकी एका मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला, तर उर्वरित तिघांना स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. ही घटना शनिवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास घडली. ओम बाळू बोरसे (वय १४, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो जनता विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत होता. गौरव शरद बोरसे, भावेश गोविंद वराडे आणि अंश शैलेश देसाई अशी बचावलेल्या तीन मुलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका शेतात काही शाळकरी मुले मका कापणीसाठी गेली होती. दुपारच्या सुमारास अंगाला खाज सुटल्यामुळे त्यांनी शेतातील तळ्यात पोहण्यासाठी उतरायचा निर्णय घेतला. मात्र पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडू लागले.
ही घटना शेजारील शेतातील कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी धाडसाने पाण्यात उतरून गौरव, भावेश आणि अंश या तिघांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर ओमचा शोध घेण्यासाठी अनिल वासुदेव वराडे, संदीप झांबरे, प्रवीण भोई, पिंटू देवकर, नरेश वराडे, गबा वराडे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. काही वेळाने ओमचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
ओम हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईकाच्या लग्नासाठी त्याची आई दोन दिवसांपासून जळगाव येथे गेली होती. शनिवारी ओम आणि त्याचे वडील लग्नाला जाणार होते; मात्र मित्रांच्या आग्रहाखातर तो शेतात गेला आणि दुर्दैवाने त्याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून शेततळ्यांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





















