
जळगाव मिरर | ३० मार्च २०२६
जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मानपुर येथील जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात बोदवड पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तसेच राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २००२ मध्ये मानपुर शिवारातील गट क्रमांक १२२ ही जमीन खरेदी करण्यात आली होती. साखर कारखाना उभारण्याच्या उद्देशाने ही जमीन घेतल्याचे सांगण्यात आले होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीनमालक चमेलीबाई तुकाराम तायडे यांच्या वारसांना योग्य मोबदला देण्याचे तसेच साखर कारखान्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, कालांतराने साखर कारखाना उभारण्यात आला नाही. उलट, ही जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असल्याचे पुढे आले. त्यामुळे तक्रारदारांनी आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू करण्यात आली आणि त्यानंतर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात फसवणूक तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलमे लावण्यात आली आहेत.
दरम्यान, पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. या प्रकरणात पुढे कोणती तथ्ये समोर येतात आणि चौकशीचा निष्कर्ष काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






















