
जळगाव मिरर | ३० मार्च २०२६
जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्कर्ष दिलीप पाटील (वय १६, रा. बोरोले नगर, चोपडा) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च रोजी प्रताप हायस्कूलजवळ उत्कर्षचा गंभीर अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात येत होते. मात्र, रस्त्यातच त्याच्या शरीरातील हालचाल बंद झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. यानंतर त्याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ड्युटीवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज करत आहेत.






















