
जळगाव मिरर | ३१ मार्च २०२६
खासगी कामानिमित्त एरंडोलकडे जात असताना धरणगाव येथील तरुणाच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार उलटून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. ३० मार्च) दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास बोरगावजवळ घडली. या घटनेमुळे धरणगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. अविनाश संजय चौधरी (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव असून, ते धरणगावच्या माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चौधरी यांचे सुपुत्र तसेच श्री इलेक्ट्रॉनिकचे संचालक व शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय वामन चौधरी यांचे चिरंजीव होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश चौधरी हे व्यवसायाने रुग्णवाहिका चालक होते. सोमवारी दुपारी ते आपल्या स्विफ्ट डिझायर (एमएच-४६, एक्स-२६३६) या कारने वैयक्तिक कामासाठी बोरगाव मार्गे एरंडोलकडे निघाले होते. बोरगावजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जबर धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, अविनाश यांची कार रस्त्यावरच उलटली. या अपघातात त्यांच्या छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
यानंतर अविनाश यांचा मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. तेथे नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. सायंकाळी ८ वाजता शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. एका उमद्या व मदतीला धावून जाणाऱ्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, कोरोना काळात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्य करताना अविनाश चौधरी यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या सेवाभावाची दखल घेत शासनाने त्यांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून गौरविले होते. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.





















