
जळगाव मिरर | २ एप्रिल २०२६
पूर्वसूचना न देता व विनापरवानगी रस्त्याचे काम सुरू केल्याबाबत जाब विचारल्याने संतप्त झालेल्या ठेकेदाराने महापालिका स्थायी समिती सभापतींनाच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार दादावाडी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक तसेच स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या वॉर्डातील दादावाडी भागात रस्त्याच्या कामाचा ठेका एका कंत्राटदाराने घेतला आहे. या परिसरात भुयारी गटारीचे काम मंजूर असून ते अद्याप प्रलंबित आहे.
दरम्यान, ३१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ठेकेदार यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच स्थानिक नगरसेवक किंवा महापालिका प्रशासनाला माहिती न देता रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. ही बाब लक्षात आल्यानंतर डॉ. पाटील यांनी घटनास्थळी जाऊन ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
तक्रारीनुसार, जाब विचारल्याचा राग मनात धरून दारूच्या नशेत असलेल्या ठेकेदाराने डॉ. पाटील यांच्याशी उद्धटपणे वागत शिवीगाळ केली. तसेच “तुम्हाला पाहून घेईन, जीवे ठार मारेन” अशी धमकी दिली. या घटनेनंतर डॉ. पाटील यांनी १ एप्रिल रोजी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भोळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात ठेकेदाराने बंदूक काढल्याची चर्चा रंगली होती. मात्र पोलिसांनी चौकशी केली असता अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





















