
जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६
शहरातील इच्छादेवी मंदिराशेजारील फुकटपुरा झोपडपट्टी भागात गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सुरुवातीला एका घरापुरती मर्यादित असलेली आग काही मिनिटांतच रौद्ररूप धारण करत शेजारील आणखी दोन घरांमध्ये पसरली. या आगीत तीन घरांतील संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंगार व्यवसाय करणारे आरिफ शेख हे आपल्या घरात झोपलेले असताना अचानक त्यांच्या घराला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ घराबाहेर धाव घेतली. मात्र, काही क्षणांतच आगीने भीषण रूप घेत त्यांच्या शेजारी राहणारे रफिक शेख आणि गंगाबाई मरसाळे यांच्या पार्टीशनच्या घरांनाही वेढा घातला.
आगीच्या तडाख्यात तिन्ही कुटुंबांचे संसार डोळ्यांसमोर जळून खाक झाल्याने कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. अकील पेंटर, आसिफ बापू, इस्माईल खान, इसाक शहा, मिलिंद सोनवणे, रियान खान यांच्यासह स्थानिक तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे, त्यांनी घरांमधील गॅस सिलिंडर बाहेर काढल्यामुळे संभाव्य स्फोटाचा मोठा धोका टळला.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत मनपाच्या अग्निशमन विभागाला कळवले. त्यानंतर अग्निशमन दलाचे चार बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रभावित कुटुंबांना तातडीच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे.





















