
जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२६
गेल्या २०-२५ वर्षांपासून असलेल्या ओळखीचा आणि एकाच गावचे असल्याचा गैरफायदा घेत एका सराफी कारागिराने सुवर्ण व्यावसायिकाचा विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. अडचणीच्या काळात घेतलेले २९६ ग्रॅम सोने परत न करता ९ लाख ३३ हजार २०८ रुपयांची फसवणूक केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संशयित सोनु डुंगरदास वैष्णव याच्याविरुद्ध १ एप्रिल रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भिकमचंद जैन नगरातील रोहीत अपार्टमेंटमध्ये ओमप्रकाश हरीरामजी सोनी (वय ४९) हे राहत असून त्यांचे बालाजी पेठेत ‘ओम ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. त्यांचे समव्यवसायिक सोनु डुंगरदास वैष्णव (रा. लक्ष्मीनगर) यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक संबंध होते. सोनु वैष्णव हे सोनी यांच्या राजस्थानमधील गावाजवळचा रहिवासी असल्याने त्यांचा प्रचंड विश्वास होता. सन २०१७-१८ मध्ये सोनु वैष्णव याने आर्थिक अडचण असल्याचे सांगून सोनी यांच्याकडे मदत मागितली होती. सोनी यांनी विश्वासाने २९६ ग्रॅम २४ कॅरेट सोने त्याला दिले होते. दि. ९ मे २०२५ रोजी हे सोने परत करण्याबाबत ६ महिन्यांची मुदत देऊन नोटरीदेखील करण्यात आली होती.
अडचणीच्या काळात ९ लाख ३३ हजार रुपये किमतीच्या २९६ ग्रॅम सोन्याचा अपहार करून फसवणूक केल्याचे सोनी यांच्या लक्षात आल्यानंतर १ एप्रिल रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी सोनु डुंगरदास वैष्णव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों अल्ताफ पठाण हे करीत आहे.
पोलिसात फसवणुक झाल्याप्रकरणी संशयित सोनू वैष्णव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ अल्ताफ पठाण, योगेश जाधव, निलेश घुगे, अमोल वंजारी, पराग दुसाने, गणेश ढाकणे यांच्या पथकाने संशयिताला अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली.





















