
जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२६
मुक्ताईनगर तालुक्यातील कोन्हाळा येथे अत्यंत हृदयद्रावक व संतापजनक घटना उघडकीस आली असून, गावालगतच्या शेताच्या बांधावर असलेल्या काटेरी झुडुपात एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित अर्भकावर सध्या जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोन्हाळा गावातील एका शेताच्या बांधालगत काटेरी झुडुपात अर्भक फेकून दिल्याची माहिती पोलिस पाटील यांनी कुन्हा दूरक्षेत्र पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस हवालदार अशोक जाधव, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव व श्रावण भिल्ल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झुडुपातून अर्भकाची सुटका करून ताब्यात घेतले.
प्रथम अर्भकाला कुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी अर्भकाला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांकडून त्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.
घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना काटेरी झुडुपात अडकलेले, अपूर्ण वाढ झालेले स्त्री जातीचे अर्भक अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आले. अर्भकाच्या अंगावर सर्वत्र काटे रुतलेले होते, तसेच शरीरावर जखमा व ओरखडे होते. अर्भकाच्या तोंडातून व्यवस्थित रडण्याचा आवाजही निघत नव्हता. हे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांचे मन हेलावून गेले.
प्राथमिक अंदाजानुसार अर्भक सुमारे सात महिन्यांचे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गर्भपात करून अर्भकाला जिवंत अवस्थेत टाकून दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अर्भकाच्या ओठांवर जखमा आणि डोक्यावर त्रिकोणी स्वरूपाची जखम आढळल्याने काहींनी जादूटोण्याचाही संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील तपास सुरू आहे.





















