
जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२६
शहरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन युवकांवर जिल्हापेठ पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. ही घटना ५ एप्रिलच्या मध्यरात्री घडली असून परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गोविंद साबळे आणि कैलास शिंदे हे ४ एप्रिल रोजी नाईट राऊंड ड्युटीवर होते. गस्त घालत असताना मध्यरात्रीच्या सुमारास शासकीय आयटीआयच्या मागील बाजूस एमएसईबी सबस्टेशनजवळ अंधाराचा फायदा घेत झाडाच्या आडोशाला दोन इसम संशयास्पदरित्या उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही युवकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून दोघांनाही पकडले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. सखोल चौकशीत त्यांनी आपली नावे फैजान आरिफ खान पठाण (वय २०, रा. मच्छीबाजार तांबापुरा) आणि अनसार शहा रुबाब शहा (वय १९, रा. बिलाल चौक तांबापुरा) अशी सांगितली. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून रात्रीच्या गस्तीदरम्यान संशयितांवर बारीक नजर ठेवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





















