
जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२६
अमळनेर शहरात लग्नाच्या आमिषाने अडीच लाख रुपये घेऊन अवघ्या आठ दिवसांत पत्नी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीची फसवणूक झाल्याने अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुकेश रमेश शिरसाठ (वय ३१, रा. सानेनगर, हल्ली नोकरी आडाजंग पाटिया, सुरत) यांचा विवाह चुंचाळे (ता. चोपडा) येथील बहिणीच्या सासरे भिकन महादू पाटील यांच्या मध्यस्थीने दुर्गा गजानन थाटोड (रा. गायेगाव, ता. अकोला) हिच्याशी ठरवण्यात आला होता. विवाह ठरवताना मुकेश यांनी अडीच लाख रुपये दुर्गा, तिची मावशी नंदा आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अज्ञात मध्यस्थ पुरुषाला दिले. ठरल्याप्रमाणे १० डिसेंबर २०२५ रोजी मध्यप्रदेशातील कुलदेवता बीजासनी माता मंदिरात साध्या पद्धतीने विवाह पार पडला.
मात्र, विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच २२ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता दुर्गा घरातून निघून गेली. त्यानंतर तिने पतीसोबत राहण्यास नकार दिला. मुकेश यांनी दिलेले अडीच लाख रुपये परत मागितले असता दुर्गाने “मला पैसे मिळालेच नाहीत” असे सांगत हात झटकला. दरम्यान, ३० मार्च रोजी मुकेश यांना त्यांची मैत्रीण सविता दीपक पाटील हिने फोन करून धक्कादायक माहिती दिली की, त्यांची पत्नी दुर्गा ही वाघळूद (ता. धरणगाव) येथील राकेश पाथरवट याच्याशी विवाह करत आहे. सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोमुळे याची खात्री झाल्यानंतर मुकेश यांनी पोलिसांच्या मदतीने ३१ मार्च रोजी वाघळूद येथे धाव घेतली. मात्र, तेथे दुर्गा आढळून आली नाही.
यानंतर २ एप्रिल रोजी दुर्गा आणि तिचा सध्याचा पती राकेश पाथरवट हे अमळनेर पोलीस ठाण्यात आल्याची माहिती मिळताच मुकेश यांनी तक्रार दिली. त्यानुसार दुर्गा, तिची मावशी नंदा आणि अज्ञात पुरुष अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करत असून या घटनेमुळे ‘लग्न’च्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.





















