
जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२६
शहरातील फातेमा नगर परिसरात आयशर वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी रिक्षा त्यावर आदळून अपघात झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी घडली. या अपघातात रिक्षाचालकासह तिघे जण जखमी झाले असून रिक्षेचेही मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फातेमा नगर येथील रहिवासी मोहम्मद युनूस रफियोद्दीन शेख (वय ७०) हे त्यांच्या रिक्षाने जात होते. त्यांच्यासोबत त्यांची सून शबाना शेख इसा आणि नात अबिशाबी शेखही प्रवास करत होते. दरम्यान, त्यांच्या पुढे भरधाव वेगात (एमएच ४८, सीबी ७९४१) क्रमांकाचे आयशर वाहन जात होते. अचानक चालकाने ब्रेक दाबल्याने मागून येणारी रिक्षा आयशरवर जोरात आदळली.
या धडकेत रिक्षाचालक मोहम्मद युनूस शेख यांच्यासह शबाना शेख इसा व अबिशाबी शेख हे तिघे जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात रिक्षेचे मोठे नुकसान झाले असून घटनेनंतर पोलिसांनी आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून अचानक ब्रेक लावण्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.





















