
जळगाव मिरर | ८ एप्रिल २०२६
पारोळा तालुक्यातील धूळपिंप्री येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत ५३ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मृत शेतकरी सतीश आत्माराम पाटील (वय ५३) हे धूळपिंप्री येथील रहिवासी असून ते माजी सरपंचही होते. नेहमीप्रमाणे ५ तारखेला सायंकाळी सुमारे साडेचार वाजता ते आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. मात्र, रात्र उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे चिंतेत पडलेल्या नातेवाईकांनी सकाळी शेताकडे धाव घेत परिसरात शोधाशोध सुरू केली. शोधादरम्यान शेतातील विहिरीत सतीश पाटील यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीजवळ पाय घसरल्याने ते पाण्यात पडले असावेत आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सतीश पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे धूळपिंप्री गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.





















