
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयात कार्यरत निवासी नायब तहसीलदार यांच्या अनियमित हजेरीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. गेल्या चार वर्षांपासून या पदावर कार्यरत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांविषयी नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असल्याचे समोर येत आहे.
कार्यालयाची अधिकृत वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी असली, तरी संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. तसेच, संध्याकाळी ठरलेला वेळ पूर्ण होण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचीही नागरिकांची तक्रार आहे. काही वेळा दुपारनंतर किंवा सायंकाळी उशिरा म्हणजेच चार-साडेचारनंतरच ते कार्यालयात दिसतात, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या परिस्थितीमुळे नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहत असून त्यांना वारंवार कार्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यालयीन कामकाजावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम तहसील प्रशासनावरही होत असल्याची चर्चा आहे.
नागरिकांनी तहसीलदारांकडे या बाबत चौकशी केली असता, “औपचारिक तक्रार करा” असा सल्ला देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना काही राजकीय पाठबळ आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.
दरम्यान, नायब तहसीलदार नेमक्या कोणत्या वेळी कार्यालयात येतात, याबाबत नागरिकांमध्ये चर्चेचे वातावरण असून काही ठिकाणी यावरून विनोदी स्वरूपात “शर्यत” लागल्याचे चित्रही दिसून येत आहे. यावरून परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होते. नागरिकांनी प्रशासनाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण आणावे व प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत, अशी मागणी केली आहे.





















