
जळगाव मिरर | ४ मे २०२६
भरधाव वेगात धावणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने वळणावर कार उलटून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २८ एप्रिल रोजी वावडदा ते रामदेववाडी दरम्यान घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम विठ्ठल कापुरे (वय २९, रा. नेपानगर) हा (एमपी ६८, सी ३५१५) क्रमांकाच्या कारने वावडदा ते रामदेववाडी दरम्यान भरधाव वेगाने जात होता. दरम्यान, रस्त्यावर असलेल्या वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्याने अचानक ब्रेक दाबला. मात्र, कारचा वेग जास्त असल्याने वाहन उलटून भीषण अपघात झाला.
या अपघातात शुभम कापुरे याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. याप्रकरणी योगेश कापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहेत.




















