
जळगाव मिरर | ४ मे २०२६
गुरांची अवैध वाहतूक रोखण्यासह गो-वंशाची कत्तल करुन मांस विक्री करणाऱ्यांवर जिल्हा पोलिस दलाने कारवाई केली. दि. ३० एप्रिल ते दि. २ मे दरम्यान राबविलेल्या मोहीमेत ७८ गो-वंशांची सुटका करण्यात आली. तर १४ वाहनांसह ६१ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारींना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जळगाव शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दि. ३० एप्रिल ते दि. २ मे पर्यंत कारवाईसह तपासणी मोहीम राबविली. यामध्ये २४ कारवाया करून २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ४६ लाख १० हजार रुपये किमतीचे १४ वाहने जप्त केली. तर १५ लाख २३ हजार २३० रुपये किमतीच्या ७८ गुरांची सुटका करण्यासह गुरांचे अवशेष जप्त करण्यात आले.
गो-वंशांची तस्करीसह मांस वाहतुक करतांना जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस दलाच्यावतीने देण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये धरणगाव येथे पठाण मोहसीनखान रेहमानखान, अहमद खान उस्मान खान व मुस्तफा शब्बीर खान कुरेशी, यावल येथे शेख अय्युब शेख युसूफ, शनिपेठ येथे आजम शेख सलीम शेख, भडगाव येथे सैय्यद रेहान सैय्यद उस्मान, अडावद येथे मुस्तफा शब्बीर खान कुरेशी, पहूर येथे शेख जमीर शेख लतिफ, रावेर येथे शेख जावेद शेख सलीम कुरेशी, चाळीसगाव येथे विष्णू रतन राठोड व अरबाज शेख अजिज शेख, मेहुणबारे येथे विशाल चंद्रकांत सुर्यवंशी, महेंद्र रविंद्र राजपूत, सावदा येथे शेख अकबर शेख चाँद, एमआयडीसी साजीद शेख यूनूस शेख, एरंडोला भूषण रमेश पाटील, चोपडा याकुब खान पठाण जांबाज मेहमूद, कासोदा शेख समीर शेख जाबीर, चाळीसगाव ग्रामीण अकबर हमीद खान व शाकीर खान यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.




















