
जळगाव मिरर | ४ मे २०२६
जिल्ह्यात अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानंतर जिल्हा पोलिस दलाने ‘ऑपरेशन ट्रॅव्हल बस’ अंतर्गत मोठी धडक मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः रात्री व पहाटेच्या वेळेत धावणाऱ्या ट्रॅव्हल बसेसवर लक्ष केंद्रीत करत अचानक तपासणी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेकदा ट्रॅव्हल बसेसच्या माध्यमातून गुटखा, हवाला व्यवहारातील रक्कम, गांजा, देसी कट्टा तसेच चोरीचा माल यांची अवैध वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. काही ठिकाणी खाजगी बसमधील कंडक्टरच कुरिअरचे काम करत असल्याची बाबही उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर पावले उचलत विशेष पथके तयार केली आहेत.
या मोहिमेअंतर्गत मुक्ताईनगर-बोदवड चौफुला, आकाशवाणी चौफुला तसेच भुसावळ परिसरात रात्री व पहाटे अचानक नाकाबंदी करून ट्रॅव्हल बसेसची सखोल तपासणी केली जात आहे. संशयास्पद बॅगा, प्रवाशांची तपासणी आणि बसेसच्या डिक्कीची पाहणी करण्यात येत आहे. यासाठी आरसीपी (रोड चेकिंग पॉईंट) चा देखील प्रभावी वापर केला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंद्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.




















