
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी फाट्याजवळ आज एक अत्यंत भीषण अपघात घडला असून आयशर ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य आपल्या एक वर्षाच्या बाळासह मोटरसायकलवरून प्रवास करत होते. दरम्यान, बेलसवाडी फाट्याजवळ वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या दाम्पत्यासोबत असलेले एक वर्षाचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले आहे. बाळाला किरकोळ दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. तसेच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.




















