
जळगाव मिरर | ७ मे २०२६
राष्ट्रीय महामार्ग ५३वर पारोळा शहरातील धुळे मार्गावर लेलँड मालवाहू वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ६ रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळ्यातील गोपाल नगरमधील देविदास प्रल्हाद नाईक (वय ५३) असे अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, देविदास नाईक हे आपल्या होंडा शाईन कंपनीच्या दुचाकी (एमएच-१९, इजे ५७४४) ने धुळे ते जळगाव मार्गाने पारोळा शहराकडे येत होते. याचवेळी जळगाव तालुक्यातील आसोदा येथील चालक राजेंद्र बाबुराव शिंदे हा धुळ्याचा दिशेने लेलँड मालवाहू वाहन (एमएच – १९, सीवाय ३२८९) घेवून जात होता. या मालवाहू वाहनाने देविदास नाईक यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नाईक यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली. यानंतर त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत नंदू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात मालवाहू गाडीचा चालक राजेंद्र शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पो.कॉ. चंद्रशेखर सोनवणे करत आहेत.
मयत देविदास नाईक हे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कारकून म्हणून नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, पत् नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर मूळ गाव असलेल्या जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.





















