
जळगाव मिरर | ९ मे २०२६
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयाचा मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा निकाल अत्यंत उल्लेखनीय लागला असून विद्यालयाने ९३.५३ टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या यशानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा संस्थेतर्फे उत्साहात सत्कार करण्यात आला.
विद्यालयाच्या निकालात विशेष प्राविण्य श्रेणीत ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत ९३, द्वितीय श्रेणीत १२७ आणि उत्तीर्ण श्रेणीत ६३ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या १० विद्यार्थ्यांनी विद्यालयाचा गौरव वाढविला आहे.
यामध्ये साई तुषार पाटील याने ४७६ गुण (९५.२० टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. ललित योगेश घुगे याने ४७५ गुण (९५ टक्के) मिळवत द्वितीय, तर अश्विनी विजय घुगे हिने ४६८ गुण (९३.६० टक्के) मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच केशव विनोद मराठे (४६७ गुण, ९३.४०%), राहुल ज्ञानेश्वर बारसे (४६० गुण, ९२%), केतन महेश पाटील (४५५ गुण, ९१%), रोहित युवराज पाटील (४५२ गुण, ९०.४०%), नयन योगेश जाधव (४५२ गुण, ९०.४०%), आदित्य राहुल हळदे (४५१ गुण, ९०.२०%) आणि सार्थक विनोद पाटील (४५० गुण, ९०%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. सुशीलदादा अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, विश्वस्त प्रेमचंदजी ओसवाल, सहसचिवा सौ. मिराताई गाडगीळ, ज्येष्ठ संचालक प्रा. शरदचंद्र छापेकर, श्री. पारसमल कांकरिया तसेच मुख्य समन्वयिका सौ. पद्मजाताई अत्रे यांच्या हस्ते गुलाबपुष्प आणि पेढे देऊन करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. विद्यालयाच्या उज्ज्वल निकालाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





















