
जळगाव मिरर | १३ मे २०२६
प. पूज्य संत श्री झिपरु अण्णा महाराज यांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी आयोजित पालखी सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रामेश्वर कॉलनी येथून नशिराबाद (झिपरु अण्णा नगर) येथे निघालेल्या पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. टाळ-मृदंगाच्या गजरात, भजन-गायनाच्या सुरात आणि “भेटी लागे जिवा”च्या जयघोषात वारकरी भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला.
सकाळी ७ वाजता श्री गजानन महाराज मंदिरात पालखी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री मुकुंद पिपळे व सौ. मंगला पिपळे उपस्थित होते. पालखी पूजनाचे यजमान श्री सुधीर डहाके व सौ. जयश्री डहाके यांनी श्री गणपती, श्री गजानन महाराज, श्री हनुमंत राया, श्री भगवान जिव्हेश्वर आणि श्री झिपरु अण्णा महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर श्री गजानन महाराजांच्या बावन्नीचे पठण करण्यात आले.
मंदिराचे संस्थापक अध्यक्ष तथा पुजारी श्री राजाभाऊ जोशी यांनी मंत्रोच्चारात पालखी पूजन विधी पार पाडला. त्यानंतर पालखीचे नशिराबादकडे जल्लोषात प्रस्थान झाले.
पालखी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष श्री किशोर कोलते, सूर्यकांत नाईक, नितीन राणे, मनोहर भालेराव तसेच श्री जिव्हेश्वर नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते श्री सुधीर खंडारे, किशोर खंडारे, सोपान आदमने, विकास डहाके, चेतन डहाके, शेखर काळे, अरुण बाकडे, आयुष, पियुष केकान आदींनी परिश्रम घेतले. महिला मंडळाच्या सौ. जयश्री डहाके, कावेरी डहाके, पुष्पा आदमने, दीपाली खंडारे, नेहा खंडारे, राधिका केकान तसेच मोक्षदा, प्रिशा, जिविका यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
पालखी मार्गावर महिलांनी टाळ-मृदंगाच्या तालावर भजन आणि गायनाचा आनंद घेतला. तरसोद फाटा येथे श्री विकासशेठ डहाके (जळगाव) यांच्या वतीने सर्व वारकरी भाविकांसाठी गरम समोसे व जिलेबी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच श्री जिव्हेश्वर युवक मंडळातर्फे मॅंगो ज्यूस व थंड पेयाचे वितरण करण्यात आले. पालखी मंडळाकडून उपस्थित महिलांना स्टॉल वाटपही करण्यात आले.
नशिराबाद येथे प. पूज्य श्री झिपरु अण्णा प्रवेशद्वाराजवळ श्री मोहन खंडारे यांनी वार्षिक परंपरेप्रमाणे भक्तांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली होती. सुरत येथील साळी समाज बांधव श्री विलासदादा गरुड आणि श्री आनंदभाऊ सातपुते (जय-विरू) यांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. भजन आणि कव्वाली गायनाने अण्णानगर परिसर दुमदुमून गेला.
या पुण्यतिथी सोहळ्यासाठी बाहेरगावाहून अनेक समाजबांधव उपस्थित राहिले. त्यामध्ये सौ. मंगला लाडके, ज्योती जगताप, लताताई धमके, श्री पंडित साळी सहपरिवार (एरंडोल), श्री महेश भोगरे, सौ. संगीता भोगरे, प्रियंका साळी, नम्रता जगताप, दीपकशेठ जगताप, रमेश सातपुते, अशोक भुतकर (केंद्र समिती, सुरत), प्रशांत जगताप सहपरिवार, मुकेश भाबळे, दत्ता भोगरे, पूर्वेश खंडारे, नेहा, अन्यन्या जगताप यांच्यासह अनेक भक्त सहभागी झाले होते.
“भेटी लागे जिवा” या वारकरी परंपरेतील भावनेचा अनुभव घेत भक्तांनी एकमेकांना भेटून आनंद व्यक्त केला. जल्लोषात पालखी श्री झिपरु अण्णांच्या समाधी स्थळी पोहोचली. तेथे मंदिर समितीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. दर्शनानंतर समाधी संस्थानाच्या वतीने आयोजित महाभंडाऱ्यात हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर वारकरी भाविकांनी समाधान आणि भक्तिभावाने परतीचा प्रवास सुरू केला.






















