
जळगाव मिरर | १९ मे २०२६
जळगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिस प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईचे भाजपा महिला मोर्चा, जळगावतर्फे स्वागत करण्यात आले असून जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. शहरातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण व दिशादर्शक असल्याचे मत महिला मोर्चाकडून व्यक्त करण्यात आले.
भाजपा महिला मोर्चाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील वाईन शॉपसमोरील ओटे, सार्वजनिक ठिकाणे तसेच वाहनांमध्ये उघड्यावर मद्यपान करणाऱ्या तब्बल ६२ जणांविरोधात करण्यात आलेली कारवाई ही कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः रस्त्यावर उतरून या मोहिमेत सहभाग घेतल्याने कारवाईला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त झाले.
महिला मोर्चाच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांमुळे शहरातील महिला, माता-भगिनी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः गिरणा टाकीसारख्या गजबजलेल्या भागात भाजीपाला व इतर खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना मद्यपींच्या उपद्रवाचा सामना करावा लागत असल्याने असुरक्षिततेची भावना वाढीस लागली होती. दरम्यान, उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना पोलिसांनी रस्त्यावर बसवून समज देणे तसेच ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्यांवर कारवाई करणे हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे महिला मोर्चाने नमूद केले आहे. या कारवाईमुळे टवाळखोर, गुन्हेगार आणि नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण होईल आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
शहरात महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशाच प्रकारच्या कठोर मोहिमा सातत्याने राबविण्याची अपेक्षा महिला मोर्चाने व्यक्त केली आहे. तसेच संपूर्ण पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभारही मानण्यात आले.
यावेळी भाजपा महिला मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा नितू महेंद्रसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, रेखा वर्मा, संगीता पाटील, ज्योती पालीवाल, नंदिनी दर्जी यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.






















