
जळगाव मिरर | २१ मे २०२६
आई वडीलांचा जेवणाचा डबा देण्यासाठी दुकानावर गेलेली असतांना, घरात एकट्याच असलेल्या पियुष प्रकाश वाणी (वय २०, रा. रेणुका नगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबियांकडून जिल्हा रुग्णालयात मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील रेणुका नगरात पियुष वाणी हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. बुधवारी सकाळच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटत असल्याने तो दवाखान्यात जावून घरी आराम करीत होता. त्यानंतर दुपारी त्याची आई वडीलांना जेवणाचा डबा देण्यासाठी सुभाष चौकात यायचे असल्याने त्यांनी घराला बाहेरुन कडी लावून त्या डबा देण्यासाठी गेल्या. याचवेळी घरी एकट्या असलेल्या पियुषने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर पियुषची आई घरी गेली असता, त्यांना पियुष हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घरात शिरताच मुलाचा मृतदेह गळफास अवस्थेत दिसून आल्याने आईने हंबरडा फोडीत आक्रोश केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने पियुषला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
पियुष हा आईवडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पियुषच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















