
जळगाव मिरर | २५ मे २०२६
भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात घरगुती वापरासाठी पाणी भरत असताना विद्युत मोटारीचा जोरदार शॉक लागून ५५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अलका पंडित जामोदकर (वय ५५, रा. फेकरी, ता. भुसावळ) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २४) सकाळी सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास अलका जामोदकर या नेहमीप्रमाणे घरगुती वापरासाठी पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी मोटारीमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला. शॉक इतका तीव्र होता की त्या घटनास्थळीच बेशुद्ध पडल्या. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
अलका जामोदकर या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ व कुटुंबवत्सल स्वभावाच्या असल्याने परिसरात त्यांचा मोठा परिचय होता. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फेकरी गावातही शोकमय वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा अमोल जामोदकर तसेच लक्ष्मण जामोदकर व चेतन जामोदकर असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने जामोदकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात येत आहे.





















