
जळगाव मिरर | २५ मे २०२६
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव शहर व जामनेर येथील चार जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून त्यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, संबंधितांना सक्षम अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.
तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये जळगाव शहरातील राम भगवान सारवान व विशाल मुरलीधर दाभाडे यांचा समावेश आहे. तसेच जामनेर येथील आनंदा बाबुराव गायकवाड व मोहम्मद फातीर तुफैल मोहम्मद शेख यांच्यावरही ही कारवाई करण्यात आली आहे.
आगामी सण-उत्सव, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती दिली आहे. सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणे, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार करणे तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधितांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
यामध्ये राम सारवान व विशाल दाभाडे यांच्या तडीपारीचा प्रस्ताव शनिपेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यांकडून पाठविण्यात आला होता. तर आनंदा गायकवाड व मोहम्मद फातीर तुफैल मोहम्मद शेख यांच्या विरोधातील प्रस्ताव जामनेर पोलिसांनी सादर केला होता. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी चौघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, मोहम्मद फातीर तुफैल मोहम्मद शेख याच्याविरुद्ध जामनेर व भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आनंदा बाबुराव गायकवाड याच्याविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात पाच गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगण्यात आले. तडीपार करण्यात आलेल्या चौघांनी उपविभागीय दंडाधिकारी अथवा सक्षम अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश करू नये, असे स्पष्ट आदेशात नमूद करण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.





















