जळगाव मिरर | हर्षल ठाकरे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेवर घाला घालू नका, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा काँग्रेस पूर्वचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांनी दिला आहे.

जिल्ह्यात नुकतेच एमएसईबी विभागामार्फत रात्री जंगल फिडरवरील वीजपुरवठ्यामध्ये २ तासांची कपात करण्यात आली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना ८ तास वीजपुरवठा होत असे. मात्र, वाढत्या उन्हामुळे विजेचा वापर वाढल्याचे कारण देत आता ही कपात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सध्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यात, विशेषतः रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पट्टयामध्ये मोठ्या प्रमाणावर केळी बागांची कापणी सुरू असून नवीन लागवडीचे कामही याच कालावधीत मोठ्या प्रमाणावर सुरू असते. अशा परिस्थितीत शेतीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असते. तर विजेशिवाय ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे रात्रीच्या वीजपुरवठ्यात कपात करणे हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे पाऊल ठरू शकते. आधीच पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, खतांची महागाई आणि उत्पादन खर्चामुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.
त्यातच आता शेतीसाठी लागणारी वीज कमी केली जात असेल, तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही, अशा तीव्र शब्दांत काँग्रेसचे जळगाव जिल्हा (पूर्व) अध्यक्ष धनंजय चौधरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच तत्काळ ही कपात मागे घेऊन पूर्ववत नियमित ८ तास वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा त्यांनी शासन आणि एमएसईबी प्रशासनाला इशारा दिला.



















