
जळगाव मिरर | संदीप महाले
जिल्ह्यात विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण तापले असताना आता जळगाव येथील जागेवर भाजप एकनिष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी देणार की दोन-तीन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देणार याबाबत मोठी चर्चा जळगाव शहराच्या राजकारणात सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राज्यभरातील अनेक विविध पक्षातील दिग्गज मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी लोकसभेनंतर विधानसभेला उमेदवारी देखील मागितली होती. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र आता विधान परिषदेसाठी जळगावच्या जागेसाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना संधी देणार की जे कार्यकर्ते अनेक वर्षापासून पक्षात कार्यरत आहे त्यांना संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसमध्ये जन्म झालेल्यांना भाजप आमदार बनवणार का ?
जळगाव जिल्ह्यातील काही दिग्गज नेत्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता त्यांना देखील आता आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. मात्र त्यांनी यापूर्वी भाजप सत्तेत नव्हते तेव्हा जिल्ह्यात सातत्याने विरोध केला होता. मात्र आता ते भाजपशी जुळवून घेत असले तरी त्यांच्या आधीपासून अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला सत्तेमध्ये आणण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहे. त्यांचा देखील यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विचार व्हायला हवा अशी देखील चर्चा जळगाव शहरात रंगू लागली आहे.






















