
जळगाव मिरर | २७ मे २०२६
जळगाव शहरातील अनेक ठिकाणी महावितरण कंपनीकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहे. मीटर रिप्लेसमेंटसाठी चक्क पाच हजार रुपयांची पावती अधिकारी बनवू लागले आहे.
जळगाव शहरातील अनेक परिसरात महावितरण कडून एनसीसी नावाच्या कंपनीला मीटर रिप्लेसमेंटचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र ही कंपनी अनेक ग्राहकांच्या घरी मीटर लावत असताना लूज कनेक्शन सोडून देत आहे. त्यामुळे अनेक मीटर जळत असतात. मात्र हे मीटर नवीन बसवण्यासाठी शासकीय पावती पाच हजार रुपयाची देत असल्याचे प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील काही परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वीज कनेक्शन देऊन त्यांच्याकडून महावितरणचे अधिकारी हफ्ते घेत असल्याची देखील चर्चा या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.
अधिकाऱ्यांची अरेरावीची भाषा !
छत्रपती शिवाजी नगर परिसरातील भारत नगर येथे असलेल्या महावितरणच्या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांची नागरिकांशी नेहमीच अरेरावीची भाषा असते, याठिकाणी बसलेले अधिकारी नागरिकांना चुकीची वागणूक देत दमबाजी व चुकीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देखील देत असतात. त्यामुळे या कार्यालयात जाणे नागरिक टाळत आहे.





















