
जळगाव मिरर | ३ जून २०२६

तालुक्यातील विदगावजवळील तापी नदीपात्रात बुडून १५ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यश अशोक भालेराव (वय १५, रा. किनगाव, ता. यावल) असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यश भालेराव हा मूळचा किनगाव येथील रहिवासी होता. शिक्षणासाठी तो जळगाव शहरातील एका वसतिगृहात राहत होता. सोमवारी तो जळगावहून आपल्या मामाच्या गावी किनगाव येथे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, विदगाव परिसरात काही मित्रांसोबत असताना तो तापी नदीच्या पात्रात उतरला.
नदीपात्रात खेळत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात गेला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हा काहीसा गतिमंद होता तसेच त्याची दृष्टीही अधू होती. त्यामुळे त्याला पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज आला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यश पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिस तपासात यश हा जळगावहून आपल्या मामाच्या गावी एकटाच ये-जा करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला दोन भाऊ असून त्याची आई बाहेरगावी वास्तव्यास असल्याचेही समजते. या दुर्दैवी घटनेमुळे किनगाव व परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





















