जळगाव मिरर | ४ जून २०२६
घरासमोर लघुशंका केल्यामुळे झालेल्या वादातून राहुल संतोष वाघोदे (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणावर तरुणीने चॉपरने हल्ला केला. ही घटना दि. १ जून रोजी कोल्हे हिल्स परिसरात घडली होती. चॉपर हे तरुणाच्या छातीत अडकून पडल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविले होते. तेथे उपचार सुरु असतांना दि. ३ जून रोजी सकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात राहणाऱ्या हर्षल संतोष घुगे (वय २०) याने दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १ जून रोजी तो आणि त्याचे मित्र राहुल वाघोदे आणि नितीन सैनी हे त्यांचा मित्र सुमित लोखंडे याच्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवणापूर्वी सर्वांनी कोल्हे हिल्स परिसरातील टेकडीवरील मोकळ्या जागेत एकत्र बसून मद्यपान केले. राहुल वाघुदे याने अतिप्रमाणात दारू पिल्यामुळे, सुमित लोखंडे याने सर्वांना शकुंतला अपार्टमेंटच्या मागे असलेल्या त्याच्या घरी विश्रांतीसाठी घेवून गेला होता. राहुल वाघुदे हा घराबाहेर आला आणि तो सुमितच्या घरासमोर लघुशंका करू लागला. हे पाहून सुमितच्या घरात राहणारी त्याची मैत्रीणने राहुलला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली
मैत्रीणनेसह सुमित याने देखील बाहेर येऊन राहुलला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. हर्षल आणि त्याचे मित्र हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच, मैत्रीणने रागाच्या भरात घरात गेली. तिने घरातून एक धारदार चाकू आणला आणि राहुलच्या छातीत आणि पोटाच्या मध्यभागी चाकू जोरात खुपसला. मात्र तो चाकू राहुलच्या छातीत अडकून पडल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
राहुलच्या मित्रांनी रक्तबंबाळ अवस्थेत राहुलला तात्काळ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू राहुलची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना, ३ जून रोजी पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. राहुलला मारहाण करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संशयित सुमित लोखंडे आणि त्याची मैत्रीण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांच्या शोधार्थ एलसीबीसह तालुका पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील हे करत आहेत.




















