
जळगाव मिरर | ८ जून २०२६

पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथील ४२ वर्षीय जवान संदीप धर्मा पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ६ जून रोजी पहाटे सुमारे १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जोगलखेडे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संदीप धर्मा पाटील हे इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलात (आयटीबीपी) सैनिक म्हणून कार्यरत होते. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पारोळा शहरातील गणपती नगर परिसरात घर घेतले होते आणि कुटुंबासह तेथे वास्तव्य करत होते. सध्या ते दहा दिवसांच्या सुट्टीवर घरी आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी घरातील कोणालाही काही न सांगता घर सोडले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान शहरापासून काही अंतरावरील उंदीरखेडा शिवारातील एका शेतात ते निंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. संदीप पाटील हे छत्तीसगड येथे आयटीबीपी दलात कार्यरत होते.
विशेष म्हणजे, त्यांच्या सेवानिवृत्तीचे शेवटचे वर्ष होते. त्यांच्या सुट्या संपल्यामुळे ते शनिवारी कर्तव्यावर रवाना होणार होते. त्याआधीच अशी घटना घडली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत गोपाल पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेच्या पुढील तपास पोलीस करीत आहे. या घटनेमुळे जोगलखेडा गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




















