
जळगाव मिरर | ११ जून २०२६

जळगाव शहरालगतच्या मानराज पार्क परिसरात गुरुवारी दुपारी कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकासह एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. कारचालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी रिक्षा कारवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून बांभोरीच्या कार (एमएच १२ टीवाय १७६२) क्रमांकाची दिशेने जात होती. मानराज पार्क परिसरात आल्यानंतर कारचालकाने अचानक वाहनाचे ब्रेक दाबले. त्याचवेळी कारच्या मागून येणारी (एमएच १९ सीडब्ल्यू ६८७७) क्रमांकाची रिक्षा वेगात असल्याने चालकाला वाहन नियंत्रित करता आले नाही आणि रिक्षा थेट कारच्या मागील भागावर आदळली.
धडक इतकी जोरदार होती की रिक्षाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर रिक्षाचालक आणि रिक्षामधील पाळधी येथील महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रिक्षातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या दोघांवरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, या अपघाताची अद्याप पोलिस ठाण्यात अधिकृत नोंद झालेली नसून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असल्याचे समजते. पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्यात येत असून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.




















