
जळगाव मिरर | १३ जून २०२६

भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बोहर्डी गावाजवळील फौजी ढाब्याजवळ शुक्रवारी (दि. १२) सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक वाहनाच्या चेंदामेंदा झालेल्या केबिनमध्ये अडकून पडल्याने त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र वरणगाव पोलीस, पाळधी महामार्ग पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परता व धाडसामुळे चालकाचे प्राण वाचविण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्राला (एचआर ५८ डी ०१९०) मुक्ताईनगरच्या दिशेने जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (आरजे ०२ सीजी ७१२७) जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघातात ट्रक चालक निजाम मोहम्मद (वय ३०, रा. हलवाडा, राजस्थान) गंभीर जखमी झाला आणि केबिनमध्ये अडकून पडला.

घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस, पाळधी महामार्ग पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चालक लोखंडी पर्त्यांमध्ये अडकल्यामुळे त्याला बाहेर काढणे अत्यंत कठीण बनले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बचाव पथकाने गॅस कटरच्या सहाय्याने ट्रकचा काही भाग कापला आणि शर्थीचे प्रयत्न करून चालकाला सुखरूप बाहेर काढले.
यानंतर महामार्गावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमी चालकाला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या बचाव मोहिमेत वरणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी भूषण माळी, गोपीचंद सोनवणे आणि सागर महाजन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच महामार्ग पोलीस विभागाचे कृष्णा पाटील, सलीम तडवी, सुनील साळुंखे, वसंत पाटील आणि संदीप पाटील यांनीही बचावकार्यात सक्रिय सहभाग नोंदविला. सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे गंभीर जखमी चालकाचा जीव वाचू शकला.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पोलिसांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसी बचावकार्यासाठी वरणगावसह परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.




















