
जळगाव मिरर | १४ जून २०२६

घरातील विश्वासू व्यक्ती म्हणून वावरणाऱ्या मोलकरणीनेच दोन घरांतील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार मेहरुण तलाव परिसरातील लेक साईट रेसिडेन्सी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणात ३ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले असून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मोलकरीण समोतीबाई धर्मराज धांडेकर (वय ३९) हिला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेक साईट रेसिडेन्सी, गणेश घाट येथे राहणाऱ्या सुधा पुरुषोत्तम काबरा (वय ५९) यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी समोतीबाई धांडेकर या गेल्या चार महिन्यांपासून काम करत होत्या. त्याचबरोबर काबरा यांच्या घरासमोरील बंगल्यात राहणारे पियूष दीपक संघवी यांच्या घरीही त्या गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून घरकाम करत होत्या.
दि. २५ मे रोजी सुधा काबरा यांना जालना येथे त्यांच्या आईकडे जायचे असल्याने त्यांनी कपाटातील ड्रॉवरमधून सोन्याचे मंगळसूत्र व मंगलपोत काढण्यासाठी पाहिले. मात्र दागिने जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पती व मोलकरीण समोतीबाई यांच्याकडे विचारणा केली. मात्र दागिन्यांबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जालना येथून परतल्यानंतर समोतीबाई धांडेकर या २६ मे रोजी मूळ गावी गेल्याचे काबरा यांना समजले. याच काळात शेजारी राहणारे दीपक संघवी यांनी घरातील दागिने तपासले असता पत्नी तेजल संघवी यांचे सोन्याचे कानातले व शॉर्ट नेकलेसही गायब असल्याचे आढळून आले. संशय बळावल्याने काबरा यांनी समोतीबाई यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जळगावात येण्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात त्या राहत्या घरी न मिळाल्याने सुधा काबरा व पियूष संघवी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून समोतीबाई धर्मराज धांडेकर यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपासादरम्यान आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेल्या दागिन्यांबाबत चौकशी सुरू आहे.
आरोपी मोलकरणीने सुधा काबरा यांच्या घरातून सुमारे १ लाख रुपये किंमतीचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र व १.५० लाख रुपये किंमतीचे तीन तोळे सोन्याचे मंगलपोत चोरल्याचा आरोप आहे. तसेच तेजल संघवी यांचा ७५ हजार रुपये किंमतीचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा शॉर्ट नेकलेस आणि ४० हजार रुपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्सही लंपास केले. अशाप्रकारे एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.




















