
जळगाव मिरर | १५ जून २०२६

‘गोल्ड लोन’साठी तारण ठेवलेले सोने सोडवून ते मोडून घेता येईल, असे आमिष दाखवून एका सुवर्ण व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा भगवान शिंदे (वय ४४, रा. अयोध्यानगर, जळगाव) हे सुवर्ण व्यवसाय करतात. सुमारे महिनाभरापूर्वी त्यांची ओम संजय महाजन (रा. गायत्री नगर, मेहरुण तलाव परिसर, जळगाव) याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेत महाजन याने शिंदे यांना एका व्यक्तीचे १९८ ग्रॅम सोने ‘गोल्ड लोन’साठी तारण ठेवले असल्याचे सांगितले.

या सोन्यावर सुमारे १९ लाख रुपये कर्ज असल्याने ती रक्कम भरून सोने सोडवून घेता येईल आणि नंतर ते मोडून नफा मिळवता येईल, असे आमिष महाजन याने शिंदे यांना दाखविले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शिंदे यांनी महाजन याच्या बँक खात्यात १९ लाख रुपये जमा केले.
मात्र, पैसे मिळाल्यानंतरही महाजन याने संबंधित सोने शिंदे यांच्या ताब्यात दिले नाही. त्यानंतर शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा करून पैशांची मागणी केली. यावेळी महाजन याने केवळ ९९ हजार रुपये परत केले. उर्वरित १८ लाख १ हजार रुपये तसेच सोनेही न देता टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कृष्णा शिंदे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून ओम संजय महाजन याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच संशयित महाजन हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शनिपेठ पोलिस करीत आहेत.




















