
जळगाव मिरर | १७ जून २०२६

न्यू इरा एज्युकेशन सोसायटी संचलित रोझलँड इंग्लिश मिडियम हायस्कूल व रोझलँड प्राथमिक विद्यामंदिराच्या संस्थापिका आदरणीय कै. डी. एस. खिमाणी मॅडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून नव्या शैक्षणिक वर्षाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदरणीय कै. डी. एस. खिमाणी मॅडम यांच्या प्रतिमेचे व प्रेरणास्थळाचे पूजन करण्यात आले. मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रेरणास्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही पुष्प अर्पण करून व वृक्षारोपण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.
यावेळी कै. डी. एस. खिमाणी मॅडम यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना, “त्यांनी लावलेले शिक्षणाचे रोपटे आज विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यांनी दिलेली शिस्त, संस्कार आणि शिक्षणाचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
यानंतर प्री-प्रायमरी व प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, स्वागतगीत तसेच विविध उपक्रमांद्वारे उत्साहात स्वागत करण्यात आले. फुले, फुगे आणि हस्तकलेच्या आकर्षक सजावटीमुळे शाळेचा परिसर आनंदी व उत्साही वातावरणाने भारावून गेला होता. नव्या वर्गाची, नवीन मित्रांची आणि शाळेची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती. नवागत विद्यार्थ्यांसाठी विशेष खाऊचेही आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी रोझलँड प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व इंग्रजी व मराठी माध्यमांतील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उत्तम संस्कार आत्मसात करून सर्वांगीण प्रगती साधावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.




















