
जळगाव मिरर | १९ जून २०२६

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्ष, महाराष्ट्र राज्य तसेच शासकीय आयुर्वेद रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित आचार्य श्रीराम शर्मा धर्मार्थ दवाखाना, गायत्री माता मंदिर, विसनजी नगर, जळगाव येथे गुरुपुष्यामृत योगानिमित्त दिनांक १८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत सुवर्णभस्म प्राशन संस्कार व त्वचारोग तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये ० ते १६ वर्षे वयोगटातील १७४ बालकांनी सुवर्णभस्म प्राशन संस्काराचा लाभ घेतला, तर ८७ नागरिकांनी मोफत त्वचारोग तपासणी व चिकित्सा शिबिराचा लाभ घेतला. त्वचारोग, हात-पायांच्या त्वचेचे विकार, कोंडा, केस गळणे, विविध प्रकारच्या ॲलर्जी तसेच इतर त्वचाविकारांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व उपचार करण्यात आले.
शिबिरास आलेल्या सर्व लाभार्थी व उपस्थित नागरिकांसाठी शीतपेयाचे वाटप करण्यात आले. यामुळे उष्ण वातावरणात उपस्थितांना दिलासा मिळाला तसेच नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
आरोग्य संवर्धन व समाजसेवेच्या भावनेतून आयोजित या उपक्रमास परिसरातील नागरिक, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.




















