
जळगाव मिरर । १९ जून २०२६

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनावट (मॉर्फ) फोटो तयार करून त्यासोबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा क्रमांक 17/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम 66(C) आणि 67 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्याद्वारे मंत्री गिरीश महाजन यांचे AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले किंवा मॉर्फ केलेले फोटो वापरून बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दोषींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





















