
जळगाव मिरर | २९ जून २०२६

भुसावळ शहरालगत झेडटीआरआय बोगद्यानजीक असलेल्या मंदिरातील मुख्य पुजाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. या खळबळजनक घटनेमुळे भुसावळ शहरासह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष रघुवीर मंचल (वय ५५, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते आरपीडी मार्गालगत लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील तीन मंदिरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे पूजा-अर्चा करत होते. धार्मिक वृत्ती व शांत स्वभावामुळे परिसरात त्यांचा मोठा आदर होता.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कुटुंबीय मंदिरात गेले असता संतोष मंचल हे मंदिराच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. कुटुंबीयांनी तत्काळ आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना बोलावले. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. त्यानंतर भुसावळ शहर पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार घडला की वैयक्तिक वैमनस्यातून अथवा अन्य कोणत्या कारणातून हत्या करण्यात आली, याचा सर्व अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक पथकाने तपासणी करून महत्त्वाचे नमुने आणि पुरावे गोळा केले आहेत.
संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्घृण हत्येचा छडा लावून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





















