
जळगाव मिरर | २८ जून २०२६

गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहनांद्वारे चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली. खेडी खुर्द शिवारात गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रक, डंपरसह त्यामध्ये भरलेली वाळू असा तब्बल १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांचे पथक पाहताच चालकांनी वाहने घटनास्थळी सोडून पलायन केले. याप्रकरणी सात संशयितांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडी खुर्द (ता. जळगाव) शिवारातील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचे उत्खनन करून वाहनांद्वारे वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
कारवाईदरम्यान वाळूने भरलेली वाहने नदीपात्रातून बाहेर काढून वाहतूक करताना दिसून आली. मात्र, पोलिसांचे पथक पाहताच चालकांनी कारवाईच्या भीतीने वाहने जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
या कारवाईत एमएच-१९-एएन-४४३० क्रमांकाचा ट्रॅक्टर (किंमत २ लाख रुपये), एमएच-१९-झेड-२७९४ क्रमांकाचा डंपर (३ लाख रुपये), एमएच-१९-झेड-४२२८ क्रमांकाचा डंपर (३.५० लाख रुपये), एमएच-१९-जे-०३१० क्रमांकाचा ट्रक (३ लाख रुपये), एमपी-०४-जीए-२१८८ क्रमांकाचा डंपर (३.५० लाख रुपये) आणि एमएच-१९-सीडब्ल्यू-३६३६ क्रमांकाचा डंपर (२.५० लाख रुपये) तसेच त्यामधील वाळू असा एकूण १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांच्या तक्रारीवरून सतीश कुंभार (रा. प्रजापतनगर), गणेश कोळी (रा. कानसवाडा), अब्दुल करीम शेख (रा. आव्हाणे), रवींद्र जाधव (रा. वाघनगर), रितेश कोळी (रा. विदगाव), विशाल सपकाळे (रा. कंडारी) आणि भूषण सपकाळे (रा. खेडी खुर्द) यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार योगेश पाटील करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि चोरट्या वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.




















