
जळगाव मिरर | ३ जुलै २०२६

लग्नासाठी मुलगी दाखवत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ४२ वर्षीय व्यक्तीवर लोखंडी मुसळीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे घडली. या हल्ल्यात दीपक प्रमोद पाटील (वय ४२, रा. तळवेल, ता. भुसावळ, ह.मु. जळगाव खुर्द, ता. जळगाव) हे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक पाटील हे मूळचे भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील रहिवासी असून सध्या ते जळगाव खुर्द येथे वास्तव्यास आहेत. दि. ३० जून रोजी उमेश तुकाराम पाटील (रा. जळगाव खुर्द, ता. जळगाव) याने कोणतेही ठोस कारण नसताना दीपक पाटील यांच्याशी वाद घातला. वाद सुरू असतानाच आरोपीने, “तू मला माझ्या लग्नासाठी मुलगी दाखवत नाहीस,” असा आरोप करत संतापाच्या भरात हातातील लोखंडी मुसळीने दीपक पाटील यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जखमींवर उपचार झाल्यानंतर त्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपी उमेश तुकाराम पाटील याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करीत आहेत.




















