
जळगाव मिरर | ३ जुलै २०२६

शहरातील गेंदालाल मिल परिसरात कमरेला पिस्तुल लावून दहशत माजविणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय वसंत अहिरे ऊर्फ भोपाली (वय ३२, रा. गेंदालालमिल बौद्ध विहार जवळ) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विजय वसंत अहिरे ऊर्फ भोपाली (वय ३२, रा. गेंदालालमिल बौद्ध विहार जवळ) हा कंबरेला पिस्तुल लावून दहशत माजवत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक सोपान गोरे, सफौ अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, छगन तायडे, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे यांचे पथक रवाना करण्यात आले. संशयीत हा पोलिसांच्या भितीने पळून जात असतांना त्याला पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले. अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीचे पिस्तुल मिळून आले. त्याला ताब्यात घेत पोलीस अंमलदार छगन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित विजय अहीरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
संशयित विजय अहिरे उर्फ भोपाली याच्याविरुद्ध शहर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, मारहाण, दंगल, बेकायदेशीरत्या शस्त्र बाळगणे यासारखे आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.




















