जळगाव मिरर | संदीप महाले
गिरणा नदीपात्रातील कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे शिरसोली परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गावातून भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड डंपरांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, दररोज रात्री १२ ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान तब्बल ५० ते ६० डंपर गावातून वाळूची वाहतूक करतात. या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

शिरसोली परिसरातील कुन्हाडदा रोड, दापोरा रोड, आकाशवाणीच्या मागील बाजूचा रस्ता तसेच पाचदेवी मंदिर रोड हे कथित अवैध वाळू वाहतुकीचे प्रमुख मार्ग बनल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गुरुवारी मध्यरात्री दापोरा रस्त्यावरील संतप्त ग्रामस्थांनी बैलगाडी रस्त्यावर उभी करून डंपरांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपरचालकांनी तात्काळ मार्ग बदलत कुन्हाडदा रोडवरून वाहतूक सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाळूने भरलेल्या डंपरांच्या पुढे आणि मागे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमधून काही संशयित व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचा ताफा असतो. त्यामुळे विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर दबाव निर्माण केला जात असून, अनेक नागरिक भीतीपोटी उघडपणे तक्रार करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले जाते.
ग्रामस्थांनी असा गंभीर आरोप केला आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही वाहतूक महसूल व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षाशिवाय शक्य नाही. रात्री गावातून डंपरांची साखळी धावत असताना संबंधित यंत्रणा नेमकी कुठे असते, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. काही दिवसांपूर्वी दापोरा गावात कथित वाळू माफियांशी ग्रामस्थांचा वाद झाला होता. त्यावेळी काही नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रातून उपसा करण्यात आलेली वाळू नेरी, जामनेर, पाचोरा आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. इतक्या लांब अंतरापर्यंत डंपरांची नियमित वाहतूक होत असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नसणे अशक्य असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीमागील संपूर्ण साखळी उघड करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा व्यापक लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.




















