जळगाव मिरर | ११ जुलै २०२६
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे सर्वोच्च नेते व संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी जळगाव येथे भव्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत सुदर्शन पॅलेस, शिरसोली रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात राजपूत समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे गुणवंत, समाजसेवक तसेच विविध क्षेत्रांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येईल. तसेच समाजातील विविध तालुक्यांमध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारे समाजसेवक, जिल्हास्तरीय नगरपरिषद व महानगरपालिकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी, समाजहितासाठी विशेष योगदान देणारे उद्योजक, आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित समाजबांधव, शासकीय सेवेत पदोन्नती मिळालेले तसेच विविध शासकीय सेवांमध्ये नव्याने निवड झालेले समाजबांधव यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रांत प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “राजपूत समाज भूषण पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला राजस्थान येथून श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या कार्यकारी अध्यक्षा ॲड. शीला सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष कटियार यांच्यासह करणी सेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व अन्य मान्यवर विशेष उपस्थित राहणार आहेत. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रविणसिंह पाटील यांनी सर्व राजपूत समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी व भव्य करण्याचे आवाहन केले आहे.




















