जळगाव मिरर | १३ जुलै २०२६
रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ मोहिमेंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाची पर्स चोरणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीतील सुमारे २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी त्याला शासकीय रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सचिन समाधान थाटे (वय ३५, रा दसरखेड, ता. मलकापूर) असे आहे.

आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी रात्री भुसावळ रेल्वे स्थानकाच्या जळगाव बाजूच्या आऊटर परिसरात सीपीडीएस पथक गस्त घालत होते. यावेळी प्रधान आरक्षक महेंद्र कुशवाहा तसेच कर्मचारी इम्रान खान, संदीप कुमार आणि भूषण पाटील यांना एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपली ओळख सचिन समाधान थाटे अशी सांगितली.
संशयिताच्या झडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे २१ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. अधिक चौकशीत त्याने सुमारे सहा महिन्यांपूर्वी भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर उभ्या असलेल्या साईनगर शिर्डीझपुरी एक्स्प्रेसमधील एका महिला प्रवाशाची पर्स चोरल्याची कबुली दिली. पर्समधील रोख रक्कम खर्च केल्यानंतर त्यातील मोबाईल विकण्यासाठी घेऊन जात असताना तो आरपीएफच्या जाळ्यात अडकला.




















