जळगाव मिरर | १३ जुलै २०२६
“सुंदर जळगाव – हिरवेगार जळगाव” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत मराठी प्रतिष्ठान, जळगाव व सुबोनियो परिवार यांच्या संयुक्त सहकार्याने मेहरून तलाव येथील सुबोनियो पक्षी घर परिसरात २०० बोगनवेलींचे वृक्षारोपण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. परिसर अधिक सुशोभित, रंगबिरंगी आणि पक्ष्यांसाठी अनुकूल करण्याच्या उद्देशाने मराठी प्रतिष्ठानने हा उपक्रम राबविला.

मराठी प्रतिष्ठानतर्फे काही दिवसांपूर्वी “बोगनवेल वृक्षदान” उपक्रमाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवघ्या काही दिवसांत २०० बोगनवेली वृक्षदान स्वरूपात उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे या उपक्रमात सर्व वृक्षदान शिक्षकी पेशातील महिला प्राध्यापकांनी केले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली. समाजात पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी महिलांनी घेतलेला हा पुढाकार प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
वृक्षदान करणाऱ्यांमध्ये माजी प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी १००, प्रा. पुनम मानधने यांनी ५०, प्रा. सविता नंदनवार यांनी २९, प्रा. डॉ. विजेता सिंग यांनी १०, प्रा. डॉ. रत्नप्रभा महाजन यांनी ७ तर प्रा. ऐश्वर्या परदेशी यांनी ४ बोगनवेलींचे वृक्षदान करून पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोगनवेलींचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी “झाडे लावा… झाडे जगवा…” हा संदेश देत लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. भविष्यात सुबोनियो पक्षी घर परिसर रंगीबेरंगी बोगनवेलींच्या फुलांनी बहरून पक्ष्यांसाठी अधिक आकर्षक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी मराठी प्रतिष्ठानतर्फे सर्व वृक्षदात्या महिला प्राध्यापकांचा विशेष सत्कार करून त्यांच्या पर्यावरणप्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या वेळी मराठी प्रतिष्ठानच्या विश्वस्त प्रा. सविता नंदनवार यांनी उपस्थितांना सुबोनियो पक्षी घर परिसरात आतापर्यंत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची, त्यांच्या संगोपनाची तसेच भविष्यात परिसर अधिक हिरवागार, सुशोभित व पक्ष्यांसाठी अनुकूल करण्याच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास महानगरपालिका पर्यावरण विभाग प्रमुख प्रकाश पाटील, वसंत पाटील, माझे शहर माझी जबाबदारीचे संयोजक सुहास दुसाने, उद्योजक सुबोध चौधरी, सुनील चौधरी, सुयोग चौधरी, सौ. हिरा चौधरी, सौ. सारिका चौधरी, डॉ. सृष्टी चौधरी, सुमोल चौधरी, हर्ष चौधरी, सौ. संजना चौधरी, राजेश चौधरी, लीना चौधरी, अर्चना नेमाडे पाटील, उडान संस्थेच्या अध्यक्षा सौ. हर्षाली चौधरी, सौ. निलोफर जमील देशपांडे, रूबीना अल्ताफ देशपांडे, उद्धव महाजन, दीपक धांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “झाडे लावणे ही सुरुवात आहे, पण ती जगवणे ही खरी जबाबदारी आहे. मराठी प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करण्याचे काम सातत्याने करत असून, पुढील काळातही जळगाव शहर अधिक हिरवेगार व पर्यावरणपूरक करण्यासाठी असे उपक्रम राबविले जातील,” असे त्यांनी सांगितले. तसेच वृक्षदान करणाऱ्या सर्व महिला प्राध्यापकांचे, उपस्थित मान्यवरांचे आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
मराठी प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सुबोनियो पक्षी घर परिसराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार असून, “सुंदर जळगाव हिरवेगार जळगाव” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





















