जळगाव मिरर | प्रतिनिधी
बालविवाहास आळा घालण्यासाठी शनिपेठ पोलिसांनी तत्परता दाखवत दोन अल्पवयीन मुलींचे विवाह ऐनवेळी रोखल्याची घटना शहरात घडली. जमुना नगर आणि कांचन नगर परिसरात दोन वेगवेगळ्या दिवशी होणाऱ्या या बालविवाहांची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत कारवाई केली. या वेळी वधू-वरांच्या पालकांना कायद्याची माहिती देत समुपदेशन करण्यात आले. या कारवाईमुळे दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्य गावांतील दोन अल्पवयीन मुलींचा विवाह शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमुना नगर आणि कांचन नगर येथील तरुणांशी लावण्याची तयारी सुरू होती. याबाबतची गोपनीय माहिती शनिपेठ पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली.
या पथकात उपनिरीक्षक प्रिया दातीर, संतोष खेडकर, पोहेकॉ विजय खैरे, अजय निकम, अनिल साळुंखे, अमोल वंजारी, पराग दुसाने, नीलेश घुगे, नत्वजीत चौधरी, संभाजी पाटील आणि गणेश ढाकणे यांचा समावेश होता. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा विवाहाची तयारी पूर्ण झाली होती आणि वधूंना हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होणार होता. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही विवाह थांबविले.
यानंतर वधू-वरांच्या पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची सविस्तर माहिती देण्यात आली. मुलीचे किमान वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे त्यांना समजावून सांगण्यात आले. पोलिसांच्या समुपदेशनानंतर संबंधित पालकांनी विवाह पुढे ढकलण्यास सहमती दर्शविली.
शनिपेठ पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, बालविवाह घडवून आणणाऱ्या वधू-वरांच्या पालकांबरोबरच अशा विवाहास मूक संमती देणारे नातेवाईक, विवाह लावणारे पुरोहित, मंडप व्यावसायिक, डेकोरेटर्स, बँड पथक तसेच छायाचित्रकार यांच्याविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात येतील. आवश्यक असल्यास संबंधितांचे व्यावसायिक परवाने रद्द करण्याची कारवाईही केली जाईल.
बालविवाह ही सामाजिकदृष्ट्या घातक आणि कायद्याने दंडनीय प्रथा असून अशा प्रकारची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिस किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शनिपेठ पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.




















